आंबेडकरी साहित्य (Ambedkarite Literature)

 

- आंबेडकरी साहित्य म्हणजे  आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व - कर्तृत्व  आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रेरणाभावातून आंबेडकरी साहित्य उर्जवान होते. मानवमुक्तीसाठीची जनआंदोलने आणि आंबेडकरी साहित्य हे परस्पर पूरक  अथवा परस्पर सापेक्षच नव्हे तर ते अभिन्न आहेत. एकमय आहेत.

 
जगाची समताधिष्ठित पुन:रचना, मानवी स्वातंत्र्याचे समर्थन  आणि बंधुभावयुक्त मानवी संबंधांवर आधारित मानवी समाजाचे निर्माण हे आंबेडकरी साहित्याचे प्रयोजन आहे. समता - स्वातंत्र्य- बंधुभाव ही तत्त्वत्रयी परस्पर पूरक आणि परस्पर संमिलीत मानणे व तिचा पुरस्कार करणे हा आंबेडकरी साहित्याचा सत्त्वभाव आहे.
 
नैसर्गिक हक्क नाकारलेल्या अर्थावंचित व्यक्ती व व्यक्ती-समूहांना त्यांचे मानवी हक्क व सत्त्व प्राप्त व्हावे यासाठी मुक्ती लढ्याचा उदघोष करणे हे  आंबेडकरी साहित्याचे ध्येय आहे या अर्थाने आंबेडकरी साहित्य  हे  मानवमुक्तीच्या  '  चळवळीचे साहित्य ' Literature of Libaration ' आहे म्हणून कलात्मकता आणि सामाजिकता यांच्या समतोलाचे सौंदर्य त्यातून प्रतीत होते.
 
व्यक्तिगत संवेदनविश्व आणि सम्यक तत्त्वदर्शन यांच्या गुणणातून (multiplication) साहित्यिकाचे व्यक्तित्त्व घडते. तेच साहित्यकृतीतून प्रस्पुरीत होते म्हणून आंबेडकरी साहित्य हे तत्त्वभावात्मक साहित्य  आहे. 
 
व्यक्तीचे संवेदनविश्व प्रभावित करणारी परिस्थिती विद्रूप असेल  आणि / किंवा व्यक्तीमात्रांजवळ  तत्त्वज्ञानाचा अभाव असेल अथवा चुकीचे  तत्त्वदर्शन तो धारण करीत असेल तर त्याचे जीवनाविष्कार सर्जनशील ठरत नाही. त्याला या दु:खस्थितीतून मुक्त व्हावे लागते... जेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली जाते आणि तो बंड करतो तेथेच मुक्तीलढे प्रारंभ होतात. मुक्तीची अनुभूती सुंदर असते. मुक्तीचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य. मुक्तीलढा हा सर्जनाचा उत्कट आविष्कार असतो. व्यक्तिविशिष्ट आणि समूह पातळीवर तो सर्जनशील निर्मितीचे नवे प्रतीत्य समुत्पन्न आविष्कार घडवीत राहतो.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला त्याच्या दलितत्त्वाचे   कारण सांगितले.  कार्यकारणभावाचे अन्वेषण करण्याची प्रतिभा दिली मुक्तीचे मार्ग सांगितले. मुक्त होऊन मानवाचे पुनरुत्थान करण्याचे ध्येय दिले. या ध्येयातूनच आंबेडकरी क्रांतिकारी तत्त्वज्ञानाचा मूल्यव्यूह तयार झाला हा मूल्यव्यूहच आंबेडकरी साहित्याचे प्राणतत्त्व होय.
 
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दलीतत्त्व विसर्जित करून ज्यांनी लोकविदू बुध्दाचा  बुध्दिप्रमाण्यावादी  मूल्यविचार  स्वीकारला त्यांची  जीवनमूल्ये  नीतीमूल्ये  व सौंदर्यमूल्ये  बदलली त्यांचे प्रतिभा आविष्कार अनन्यपणे  नवेच होते.' जीर्ण मूल्यांची घोंगडी फेकून देऊन नवी निळी शाल पांघरा"--- असे त्या स्थितीचे वर्णन महाकवी वामनदादा यांनी तेव्हा केले होते. १९९३ च्या वर्धा येथील पहिल्या अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात लिहिले होते --- '' जीवनात श्रेष्ठ आदर्श कोणता यांची मांडणी आंबेडकरी तत्त्वज्ञान  करते. आंबेडकर हे आता एका व्यक्तीचे नाव राहिलेले नाही, ते आता एका विचारधारेचे नाव झालेले आहे. आणि आमच्या लिहिण्याची प्रेरणा तर आंबेडकरीच आहे. म्हणून आपल्या या साहित्याला  'दलित ' साहित्या ऐवजी 'आंबेडकरी साहित्य' संबोधावे असा विचार अनेक वर्षापासून सुरु आहे. आंबेडकर जन्मशताब्दीपासून  म्हणजे  गेल्या दोन - तीन  वर्षापासून हा समूह विचार बनत चालला आहे. आता शाब्दिक अवडंबर आणि वैचारिक  गोंधळ नको आहे. या साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे आपण या वळणावर येऊन पोहचलो की, यापुढे आमचे साहित्य  हे ' आंबेडकरी ' या नावानेच ओळखले जाणार आहे.
 
' दलित ' या शब्दात मनाच्या कोपऱ्यात विषमतावादी हिंदुत्व जोपासण्याची व कधी कधी मार्क्सवादी म्हणवून क्रांतिकारी समजून घेण्याची जी सोय होती ती यापुढे   "आंबेडकरी" या शब्दात राहणार नाही. आंबेडकरी म्हणजे तथागाताचा जीवनमार्ग स्वीकारणारा, फुल्यांच्या सामाजिक, धार्मिक विचाराचे विश्लेषण करणारा आणि अखिल मानवी समता मूल्यावर आढळ विश्वास बाळगणारा माणूस होय.
 
आंबेडकरी साहित्यातील कथा, कवितेला हे भान ठेवावे लागणार आहे. आंबेडकरी  साहित्य म्हणजे दलित साहित्याच्या निर्मितीचा पुढील  विकास टप्पा होय.
'दलीतत्त्व' हे हिंदुत्व सापेक्ष असते. क्रमबद्ध  विषमतेची इतकी अमानुष नकारात्मक मनोवस्था काळाच्या कुठल्याही टप्प्यावर अन्यत्र आढळत नाही. भारतातून बुद्धविचारांचा ऱ्हास झाल्यानंतर मध्ययुगीन कालखंडात केव्हा तरी  बुद्धिप्रामाण्यवाद  बहिष्कृत केला गेला. त्यातून दलितत्त्व लादले गेले. दलितत्त्व ही  मनोवस्था आहे. तिचे नेहमी वर्ण-व्यवस्थेतील अन्य वर्ण-जातींशी द्वंद्वात्मक संबंध राहणार ! अर्थात  जोपर्यंत  दलितत्त्व  राहील तोपर्यंत धर्मकलह राहील आणि त्यातून कोणतेही सर्जन घडणार नाही. म्हणून राष्ट्रहीत  आणि दलितत्त्वाचा विलय होणे अपरिहार्य आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही द्वंद्वात्मकता संपविण्यासाठी बुद्धाविचाराची ' नवी नैतिकता ' स्वीकारली. ज्यांनी ही नवी नैतिकता स्वीकारून नव्या सामाजमूल्यांचे - समष्टीशी बांधीलकीचे वाड:मयीन ध्येय स्वीकारले त्यांचे साहित्य सर्जनशील झाले.
 
- भीम-गीतकारांनी आपल्या गीतातून आंबेडकरी प्रेरणा प्रथमत: संप्रेषित केली. आंबेडकरी चळवळीत त्यांचे योगदान अनन्य महत्त्वाचे आहे. स्वत:ला दलित साहित्यिक म्हणवून घेण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. 
 
- दलित मुक्तीसाहित्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे अभिजनांना कळले नाही. त्यांनी जनतेच्या मुक्तीसाहित्याला दलितसाहित्य संबोधीले ! स्वत्वशोध न घेता इतरांनी दिलेले हे संबोधन स्वीकारणे आंबेडकरी साहित्याने नाकारले. विभावरी/श्री.म. माटे/शरच्चंद्र मुक्तिबोध/ मुल्कराज  आनंद / अमृतलाल नागर / यांच्या काही साहित्यकृतीतून मानुष जाणिवा व्यक्त होतात. म्हणून त्यांना दलित साहित्यिक म्हणविणे जमत नाही. ज्यांना दलितत्त्व भारताचे रूपक वाटते त्यानाही ते स्वत; प्रत लावून घेणे साहणार नाही. कुणीतरी दलित असेपर्यंतच  आपण उच्च राहू शकतो, हे जाणणारी माणसे दलितत्त्वाचे उदात्तीकरण करतात - हे अज्ञान की कौटिल्य !
 
- 'शोषणाचा, गुलामीचा संदर्भ ज्या साहित्याला असेल आणि त्यातून मुक्तीची जाणीव आंबेडकरी प्रेरणेने झाली असेल असे जगातील  कोणतेही साहित्य आंबेडकरी साहित्य आहे'. म. भ. चिटणीस, भदंत आनंद कौसल्यायन,  रूपा बोधी, माईसाहेब आंबेडकर, यांचे साहित्य आंबेडकरी साहित्यच ठरावे. तसेच जगभर आंबेडकरवादाची उर्जा घेऊन लढणारे साहित्यिक आंबेडकरी साहित्याची निर्मिती करतील.
 
- मिलिंद साहित्य सभा, अस्मितादर्श, सिंहगर्जना, समुचित , निकाय,  या विचारपीठांतून आंबेडकरी साहित्य साकारत गेले. नामदेव ढासळ, राजा ढाले, बाबुराव बागूल, यशवंत मनोहर,  यांनी आंबेडकरी साहित्याला युगसाहित्य ठरविले. आता नव्या ई-युगात आंबेडकरी साहित्यच जागतिक साहित्याचे वैचारिक  नेतृत्व करेल .....याचे भान आंबेडकरी साहित्यिकांनी बाळगून  साहित्य निर्मिती केली पाहिजे....

This free website was made using Yola.

No HTML skills required. Build your website in minutes.

Go to www.yola.com and sign up today!

Make a free website with Yola